सांगली : जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी सांगली शहर व परिसराला झोडपले. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचून दोन तास वाहतूक विस्कळीत झाली.दुपारी साडे चार वाजता वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. विद्युत तारांचेही त्यामुळे नुकसान झाले. त्यानंतर मुसळधार पावसास सुरुवात झाली. सायंकाळी तासभर पावसाने हजेरी लावली. उत्तर शिवाजी नगर, काँग्रेस भवन, राम मंदिर चौक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, स्टेशन रोड, स्टँड रोड, आमराई रोड या परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. सांगलीच्या राम मंदिर चौकासह स्टेशन रोडवर वाहतुकीची कोंडी झाली.शहरात गेल्या चार दिवसांपासून अपवाद वगळता दररोज सायंकाळी पावसाची हजेरी लागत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवार व शनिवारी आकाश निरभ्र राहणार असून, त्यानंतर दोन दिवस पुन्हा पावसाची हजेरी लागणार आहे. या काळात तापमानही चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची चिन्हे आहेत. पाऊस पडल्यानंतरही उकाड्यापासून सुटका नाही.
विद्युत पुरवठा खंडितवादळी वाऱ्याने अनेक भागात विद्युत यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे गुरुवारी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी तो पूर्ववत झाला.