सांगली/जत/उमदी : महिन्याभरापासून लांबलेल्या पावसाने सोमवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात हजेरी लावल्यामुळे बळिराजा सुखावला आहे़ जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे तेथील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ८़६ मिलिमीटर पाऊस झाला आहे़सोमवारी आणि मंगळवारी दिवसभरात जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली़ जत तालुक्यातील उमदी, हळ्ळी, बालगाव, सुसलाद, सोनलगी आदी दुष्काळी भागात मुसळधार पाऊस झाला आहे़ ओढे, बांधारे, तलाव तुडुंब भरले आहेत़ उमदीत दीड तासात १०३ मिलिमीटर, तर जत तालुक्यात ३१़५ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ या पावसाने जत तालुक्यातील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ आटपाडी तालुक्यात ११़३ आणि कवठेमहांकाळ तालुक्यात १७़५ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ कडेगाव तालुका सोडल्यास अन्य सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे़ मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असून, दिवसभर ढगाळ वातावरण होते़जत शहरासह तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली. चार गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार दीपक वजाळे यांनी दिली. जत तालुक्यात मागील आठ-दहा वर्षात प्रथमच जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. उमदीत आज सायंकाळी पावसाने सुरुवात केली. जोरदार पावसाने उमदी गावानजीक असणारे विजापूर-पंढरपूर महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने एसटीची व वाहनांची वाहतूक काही तास ठप्प झाली होती. उंची कमी असल्याने वारंवार हे पूल पाण्याखाली जातात, त्यामुळे लोकांना कसरत करावी लागते. (प्रतिनिधी)
जत तालुक्यात मुसळधार पाऊस
By admin | Published: July 09, 2014 12:32 AM