शनिवारी दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे, नाले वाहू लागले आहेत. सखल भागात तसेच तालीच्या रानात तुडुंब पाणी साचले. परिणामी खरिपाची पिके पाण्यात बुडाली.
दमदार पावसामुळे खानापूरचा पाझर तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याने पाझर तलावाचा नयनरम्य धबधबा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुरू झाला आहे.
खरीप हंगामातील पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे. खानापूर, तामखडी, पोसेवाडी, अडसरवाडी, मोही, सुलतानगादे, भिवघाट, हिवरे, पळशी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. जाधववाडी, बलवडी, मेंगाणवाडी परिसरात पावसाचा जोर कमी होता.
सुलतानगादे साठवण तलावाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसांत तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.