लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुसळधार पावसाने सांगली शहर जलमय झाले आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी पहाटेपर्यंत कायम होता. त्यामुळे शहराच्या सखल भागासह गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. रविवारीही सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी पडले.जिल्ह्यात सप्टेंबरअखेर शासकीय दप्तरी पावसाळा संपला असला तरी, आॅक्टोबरचा पहिला पंधरवडासुद्धा पावसाने उघडीप दिलेली नाही. सलग पावसाच्या हजेरीने नागरिकांना हैराण केले आहे. शेतीच्या नुकसानीसह सणाच्या उत्साहावर पावसाचे पाणी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी रात्री मुसळधार पावसाने शहराला झोडपले.रविवारी पहाटेपर्यंत पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे शहराला जलमय स्वरुप प्राप्त झाले होते. शहराच्या अनेक भागात तलाव साचले होते. क्रीडांगणे, सखल भाग, बाजारपेठा आणि गुंठेवारी अशा सर्वच भागांमध्ये साचलेल्या पाण्याचे अस्तित्व रविवारीही कायम होते.दिवाळी असल्याने सांगली शहरात प्रमुख बाजारपेठांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील नागरिक गर्दी करीत आहेत. शनिवारी प्रमुख बाजारपेठा ग्राहकांनी फुल्ल होत्या. त्याचदिवशी सायंकाळी पावसाने ग्राहक व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रविवारीही बाजारात दिवसभर गर्दी होती. सायंकाळी पुन्हा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी कमी झाली.
मुसळधार पावसाने सांगली जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:51 PM