कोकरुड : गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाने आणखी जोर धरला असून, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलास पाणी लागले. या मार्गे कोणीही प्रवास करू नये, यासाठी कोकरुड आणि शाहूवाडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मेणी ओढ्यावरील सय्यदवाडी-गवळेवाडी, येळापुर-समतानगर, शेडगेवाडी-हत्तेगाव हे सर्व पूल खचले असून, आरळा, मराठवाडी, काळुद्रे येथील उबाळे वस्ती, शेडगेवाडी फाटा, चिंचोली, कोकरुड येथील शंभरावर घरात पाणी शिरले आहे.
शिराळा पश्चिम भागात गुरुवारी पडलेल्या पावसापेक्षा जास्त पाऊस पडत असून, वारणेचे पाणी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यास जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलास पाणी लागले आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीचे पाणी शिवारात घुसले असून, ऊस, मका आदी पिके मोडून पडली आहेत. वस्तीवरील जनावरांची शेड, स्मशानभूमी पाण्यात बुडल्या आहेत. आरळा-शितूर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, बिळाशी-भेडसगाव पुलावर दहा फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. आरळा येथील बाजारपेठ, मराठवाडी, काळुद्रे येथील उबाळे वस्ती, मोहरे, चिंचोली, खुजगाव, कोकरुड येथील शंभरपेक्षा जास्त घरे पाण्याखाली गेली. पुराच्या पाण्यामुळे आरळा, मोहरे, चिंचोली, खिरवडे, बिळाशी, कोकरुड येथील राज्य मार्गावर पाणी आहे. पश्चिम भागातील सर्व लहान मोठ्या पुलासह रस्त्यावर पाणी असल्याने दूध वाहतूक ठप्प झाली होती. मेणी ओढ्यावरील सय्यदवाडी-गवळेवाडी जुना पूल, येळापूर-समतानगर येथील नव्याने बनवलेला पूल आणि शेडगेवाडी-हत्तेगाव हे तीनही पूल पावसाने खचले.