सांगली : आज, मंगळवारी पहाटेपासून झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संततधार पावसाचा रब्बी पिकांना मात्र फायदा झाला आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १२.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.मंगळवारी पहाटेपासून मेघगर्जनेसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संततधार पाऊस कोसळल्यामुळे ओढे-नाले पावसाने भरून वाहत होते. अनेक तलाव तुडुंब भरले आहेत. सखल भागातही पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मिरज तालुक्यात सर्वाधिक २४ मिलीमीटर तर वाळवा तालुक्यात १९.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यात ४.६ मिलीमीटर, तासगाव १५.१, शिराळा ३.९, आटपाडी १.४, कवठेमहांकाळ ६.९, पलूस ८.७ आणि कडेगाव तालुक्यात ३.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.फुलोऱ्यातील द्राक्षबागांना सर्वाधिक फटकासततचा पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाने जिल्ह्यातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफुट, डीपिंग या अवस्थेत आहेत. फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांचा आहे. प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे द्राक्षबागायतदारांना फटका, मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊस
By अशोक डोंबाळे | Published: October 11, 2022 4:12 PM