सांगली : कोयना, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात बुधवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोकरूड, चांदोली, चरण येथे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे वारणा धरणातील विसर्ग तीन हजार ५०० क्युसेकने वाढवून ११ हजार ५८५ क्युसेकने सुरू आहे. कोयना धरणातून ४२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. दोन्ही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णेची पाणीपातळी पुन्हा ३९ फुटांवर गेली आहे.जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर धरण क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळच्या २४ तासांत वारणा धरण क्षेत्रात ७३ मिलिमीटर, तर कोकरूड येथे ६५.३, तर चरण येथे ८९.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा २९.६० टीएमसी झाला आहे. म्हणून धरणातून साडेतीन हजारांनी विसर्ग वाढविला आहे. बुधवारी दुपारपासून धरणातून ११ हजार ५८५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रात ९२ मि.मी. पाऊस झाला असून, धरणात ८५.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभर पाऊस सुरू राहिला. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील पाणीपातळी कमी झाल्याने पुराचा धोका टळला होता; परंतु पुन्हा पाऊस आणि धरणातून विसर्ग वाढविल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली. त्यामध्ये आणखी काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
चोवीस पूल, बारा बंधारे पाण्याखालीचनदीकाठावरील पिके अद्यापही पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यातील २४ पूल आणि १२ बंधारे पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यात अद्यापही २५ रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.
अलमट्टीतून साडेतीन लाख क्युसेकने विसर्गअलमट्टी धरणातील पाणीसाठा ६७.६२ टीएमसी झाला असून, तीन लाख २३ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणातून तीन लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
जिल्ह्यात १५.९ मिलिमीटर पाऊसबुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात १५.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दिवसाचा पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंतच्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ८.६ (४३७.७), जत १ (२७३.५), खानापूर ६.७ (३५४.२), वाळवा ३०.२ (७०५.९), तासगाव ८.४ (४३२), शिराळा ५३.५ (११०४.९), आटपाडी १.५ (२५४.१), कवठेमहांकाळ ५.९ (३८४.२), पलूस १८.४ (४८९.६), कडेगाव १६.८ (४७६.३).
कृष्णा नदीची पाणीपातळीफूट इंचांमध्येकराड कृष्णा पूल ३०.०१बहे पूल १३.०६ताकारी पूल ४२.०७भिलवडी पूल ३९.१०आयर्विन ३९अंकली ४३.११राजापूर बंधारा ५३.०२
धरणातील पाऊस व पाणीसाठाधरण -पाणीसाठा (टीएमसी) -टक्केवारीकोयना- ८५.९७ - ८१चांदोली - २९.६० - ८५धोम - ११.४६ - ८४कण्हेर - ०८.०२ - ८०अलमट्टी - ६७.६२ - ५५
पूरग्रस्त १०४ गावांतील पशुधनासाठी चारा छावणीकृष्णा आणि वारणा नदीकाठच्या १०४ पूरग्रस्त गावांमधील पशुधनासाठी चारा छावणी सुरू केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुरवठादारांकडून निविदा मागविल्या आहेत. हवामान विभागाने मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययाेजना केल्या जात आहेत.