वारणावती : चांदोली धरण परिसरात पाच जूनपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सलग चार दिवस अतिवृष्टी होत आहे. पावसाची संततधार कायम आहे. पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवार सकाळी आठपर्यंत २४ तासांत १२० मिलिमीटरसह एकूण ६६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा जोर कायम असल्यामुळे येथे अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून नदीपात्रात ७३२ क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू आहे. पण ओढ्या-नाल्यांतून प्रचंड प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा पात्राबाहेर पडून कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.धरण सध्या ४८.५५ टक्के भरले आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६०५.७५ मीटर झाली असून पाणीसाठा १६.७० टीएमसी झाला आहे. सध्या पावसाची संततधार कायम सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रात तर मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १५ हजार ३१२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा पावसाने सुरुवात केली असली, तरी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिवारात पाणीच पाणी साचून आहे. परिसरात वाराही सोसाट्याचा वाहतो आहे. वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. वीजपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.