सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, कडेगाव, खानापूर या दुष्काळी तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण क्षेत्रात मात्र फारसा पावसाचा जोर नसल्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे.सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने सुरुवात केली आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात पाऊस कमी आहे, पण दुष्काळी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तासगाव तालुक्यात २२.५ मिलीमिटर पाऊस झाला, तर आटपाडी तालुक्यातील करगणी येथे ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. कवठेमहांकाळ तालुक्यात ५३ मिलीमीटर पाऊस झाला असून अग्रणी नदीला पूर आला आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक बंद होती. जत तालुक्यात २१.८, तर खानापूर तालुक्यात २६.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कडेगाव तालुक्यातही ३२.५ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
अलमट्टी ८९.६८ टक्के भरले
जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. यामुळे अलमट्टी धरणात सध्या ११०.३८ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८९.६८ टक्के भरले आहे. वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात शुक्रवारी सात मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात २७.३१ टीएमसी म्हणजे ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात ६५.५७ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ६२ टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील पाऊस (मिलीमीटर)तालुका - पाऊसमिरज - ७.५आटपाडी - १७.८शिराळा - २.८तासगाव - २२.५क.महांकाळ - ५३पलूस - ८.३कडेगाव - ३२.५वाळवा - ६खानापूर - २६.५जत - २१.८