गंगाराम पाटीलवारणावती : चांदोली धरण परिसरात जूलै मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे चार दिवसात धरणातीलपाणीसाठा झपाट्याने वाढला. त्यानंतर हळूहळू साठा वाढत राहिला. अखेर आज, शुक्रवारी चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. सद्या पाण्याची चिंता मिटली असली तरी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू केला आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरणाची ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने आवश्यकतेनुसार धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. काल, गुरूवारी धरणाचे वक्राकार दरवाजे बंद केले होते. यानंतर आज, शुक्रवारी पुन्हा पावसाचा जोर वाढवल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.सध्या धरणाच्या वक्राकार दरवाजातून एक हजार व जलविद्युत केंद्राकडून १५६१ क्युसेक असा एकूण २५६१ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. या परिसरात जून पासून आजअखेर एकूण २६८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणी साठा सकाळी ३४.४० टीएमसी झाला होता. पण दुपारी वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू केल्याने पाणीसाठा ३४.३६ टीएमसी झाला आहे.
पावसाचा जोर वाढला, चांदोली धरणातून पुन्हा विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 6:12 PM