इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात बुधवारी रात्री मान्सूनच्या पावसाने हाहाकार माजविला. रात्री नऊ वाजता सुरू झालेला हा पाऊस पाच तास एकसारखा कोसळत होता. या पावसाची ११०.३ मि. मी. नोंद झाली आहे. अतिवृष्टीचा दणका पहिल्याच पावसाने दिला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. बुधवारी सायंकाळपासून शहर आणि परिसरात आभाळात पावसाळी ढगांची एकसमान पद्धतीने भरणी झाली होती. त्यामुळे रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. रात्री नऊच्या सुमारास पावसाच्या धारांनी कोसळायला सुरुवात केली. काही वेळातच या पावसाने रौद्ररूप धारण केले.
मान्सूनच्या या पहिल्याच पावसाने अतिवृष्टीचा दणका दिल्याने शहर व परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले होते. शहराच्या सकल भागात पहाटेपर्यंत रस्त्यारस्त्यांवर पाणी साचून राहिले होते. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास थोडीशी उसंत घेतली. त्यानंतर पुन्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतच होता. या पावसामुळे शहर आणि परिसरात कोठेही पडझड अथवा वित्त झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झालेली नव्हती.