शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने एक तास हजेरी लावली. कापरी परिसरास सलग तिसऱ्यांदा वादळी वारे व अवकाळी पावसाने झोडपले. ऊस, भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांचे शेड इत्यादींचे माेठे नुकसान झाले. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला.
शिराळा शहर परिसरासह चिखली, सांगाव, बिऊर, मांगले, कापरी, कोकरूड, आरळा या तालुक्याच्या उत्तर भागात वादळी वारा, गारा व पाऊस यामुळे शेतातील पिके, आंबा, घरे व पत्र्यांच्या शेडचे व गवत गंजींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दुपारी चारच्या सुमारास ढगांचा गडगडाट होऊन जोराचे वारे सुटले. काही ठिकाणी गारांचाही मारा सुरू झाला. त्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. टोमॅटो पिके जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी आडसाली ऊस पडले. रस्त्याकडेची झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. कोथंबिरीसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाने विक्री व्यवस्था कोलमडल्याने भाजीपाला व शेतमालाचे नुकसान झाले असताना परत वादळी वारे, गारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
नुकसानग्रस्त भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांच्या शेडची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.