शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने दीड तास हजेरी लावली.
यामुळे ऊस, भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांचे शेड आदींचे नुकसान झाले. काही ठिकाणी पावसामुळे ऊसपिकास जीवदान मिळाले आहे.
शिराळा शहरासह चिखली, सागाव, बिऊर, मांगले, कापरी, कोकरूड, आरळा व तालुक्याच्या उत्तर भागात वादळी वारा, गारा व पाऊस यामुळे शेतातील पिके, आंबा, घरे व पत्र्यांच्या शेडचे व गवत गंज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ढगांचा गडगडाट होऊन जोराचे वारे सुटले. टोमॅटो पिके जमीनदोस्त झाली आहेत.
काही ठिकाणी आडसाली ऊस पडले आहेत, तर झाडेदेखील उन्मळून पडली आहेत.