शिराळा : शिराळा व तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तासभर दमदार पाऊस पडला. मका पिकांचे व आंब्याच्या बागांचे नुकसान होणार असले तरी पडलेल्या पावसामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
दहा-बारा दिवसांपासून उकाडा, ढगाळ वातावरण होते. दोन दिवस वादळी वारा सुटला होता, मात्र पाऊस पडला नव्हता. मंगळवारी तालुक्यातील पाडळी, वाकुर्डे, अंत्री, कोकरूड, शेडगेवाडी, सागाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील पन्नास टक्के पाझर तलाव कोरडे पडले आहेत. पावसाने काहीअंशी नुकसान झाले असले तरी बागायत शेतीसाठी लाभदायक ठरणार आहे.
शिराळा तालुक्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरीप हंगामातील भाताची पेरणी होते. एप्रिलपासूनच खरिपातील पेरणीसाठी तालुक्याच्या पश्चिम भागात भातपिकासाठी शेत तयार करायला सुरुवात होते. यासाठी वळवाचा पाऊस उपयुक्त ठरतो.
सध्या तालुक्यात खरीप हंगामातील पिकासाठी शेतीच्या मशागती व ऊस पिकांच्या झालेल्या लावणी व खोडवी पिकाच्या फोडणीची व आंतरमशागतीची कामेही गतीने सुरू आहेत. तालुक्यात अजूनही वळवाच्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.