कोकरूड : शिराळा पश्चिम भागातील कोकरूड, शेडगेवाडी, येळापूर, मेणी, गुढे-पाचगणी परिसरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी, खरीप पेरणी लांबणार आहे. तसेच सुरुवातीला पेरणी केलेल्या पिकांची चांगली उगवण होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी शिराळा पश्चिम भागात सर्व गावे, वाड्या-वस्तीवर मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर शुक्रवारी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली हाेती. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह कोकरूड, शेडगेवाडी, येळापूर, मेणी गुढे-पाचगणी पठारावरील वाड्या वस्त्यांवर मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या धूळवाफ पद्धतीने भाताच्या पेरण्या सुरू हाेत्या. त्या पावसामुळे खोळंबल्या आहेत. परिसरात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. शनिवारी दुपारी पडलेल्या या पावसाचा त्यास चांगला फायदा होणार आहे. गुरुवारी पडलेल्या पावसाप्रमाणे शनिवारीही मुसळधार पाऊस पडून ओढे, नाले भरून वाहत हाेते. मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. या आठवड्यात सलग दुसऱ्या वेळी मेणी ओढ्याला पाणी आले आहे.