२१०७२०२१-एसएएन-०२ : सांगली शहरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर संततधार सुरू असल्याने येथील शिवाजी मंडई परिसरात पाणी साचले होते. (छाया : सुरेंद्र दुपटे)
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे वारणा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभरात कृष्णा नदीच्या पातळीत १ फुटाने वाढ नोंदली गेली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात नोंदला गेला. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. चोवीस तासांत ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रातून १२ हजार २४२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वारणा धरणातून सध्या १११५ क्युसेक विसर्ग सुुरू आहे. त्यामुळे नदीपातळीत काहीप्रमाणात वाढ झाली आहे.
शिराळा तालुक्यातील कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेल्याने रेठरे, गोंडोली, भराडवाडी, जांभळेवाडी येथील लोकांना चरण, नेर्लेमार्गे प्रवास करावा लागत आहे. पश्चिम भागातील बिळाशी, कोकरुड, शेडगेवाडी, चरण, आरळा, मणदूर, गुढे, पाचगणी, येळापूर, मेणीसह परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मिरज, वाळवा, तासगाव, कडेगाव, पलूस, खानापूर, आटपाडी व जत तालुक्यांतही पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असून, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या २५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
चौकट
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू नाही. तरीही संततधार पावसाने नदीपातळीत बुधवारी दिवसभरात एक फुटाने वाढ झाली आहे. बहे येथे ६.४, ताकारीत १४.१०, सांगलीत आयर्विन पुलाजवळ १०.९, अंकलीत १३.१, तर म्हैसाळ बंधाऱ्याजवळ २४ फूट पाणीपातळी आहे.
चौकट
तालुकानिहाय पाऊस
पाऊस (मि. मी.)
जिल्हा १२.१
मिरज ७.५
जत १३.७
खानापूर २.३
वाळवा १५
तासगाव ४.२
शिराळा ४४.४
आटपाडी २.३
क.महांकाळ ४.६
पलूस ९.६
कडेगाव ५.६