सांगली : महाडजवळ ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व इतर जुन्या पुलांचा आढावा घेण्यासाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक होत आहे. यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनाला सूचना दिल्या. महाड येथील घटनेनंतर जिल्ह्यातील जुन्या पुलांच्या स्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जुन्या व रहदारी असलेल्या पुलांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याबाबत चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी त्यांना माहिती दिली. आयर्विन पुलाबरोबरच सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली येथील पूल, गुहागर-कडेगाव राज्यमार्गावरील नांदणी नदीवरील पूल, मिरज-म्हैसाळ मार्गावरील वड्डी येथील ओढ्यावरील पूल आणि गुहागर राज्यमार्गावरील येरळा नदीवरील पुलांची स्थिती व त्यावरील रहदारीचा आढावा त्यांनी घेतला. बांधकाम विभागाने जिल्ह्यातील जुन्या व विशेषत: ब्रिटिशकालीन असलेल्या पुलांची मान्सूनपूर्व पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यात कोणत्याही पुलास धोका नसल्याचे सांगितले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आज बैठकीत सर्व पुलांच्या स्थितीबाबत चर्चा होणार आहे. यापूर्वीच शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करत आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)निर्देशांचे पालन करणार आयर्विन पुलाबाबत सात वर्षांपूर्वीच सूचना आल्यानंतर तेथे फलक लावून सूचना देण्यात आली असली, तरी अजूनही या पुलावरून अवजड वाहतूक होते. या वाहतुकीला पर्यायाबाबत निर्णय घेताना शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.
आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीस बंदी येणार
By admin | Published: August 05, 2016 1:52 AM