मिरज : मिरजेत पावसाने रस्त्यांची दैना उडाली आहे. भीमनगर झोपडपट्टी परिसरातील रस्त्यांत वारंवार वाहने अडकत आहेत. रस्त्याची अपूर्ण कामे, वाहतूक कोंडी, खोदलेल्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य, खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी, यामुळे होणारे अपघात, रस्त्यात अडकणारी वाहने यामुळे नागरिक संतप्त आहेत.
महापालिका प्रशासनाकडे तक्रारी स्थानिक नगरसेवकाकडे नागरिकांनी पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. शहरात रस्ते, ड्रेनेजची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसात या भागांत पावसाचे पाणी घरांत शिरते. येथील नागरिकांनी नगरसेवकांना जाब विचारल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांकडून रस्ते व ड्रेनेज समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात येते. मात्र, समस्या कायम असल्याने संतप्त नागरिकांनी येथे रस्त्यात अडकलेले वाहन हलवू न देता वाहतूक बंदचा इशारा दिला आहे.