सांगली : लिंगायतसह सर्व पोटजातींना त्यांच्या त्यांच्या प्रवर्गानुसार लिंगायत नावासह आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) लिंगायत समाजाने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व विजय सगरे यांनी केले. लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना त्यांच्या प्रवर्गानुसार आरक्षण देण्यात यावे, समाजातील ज्यांना आरक्षण आहे, त्यांचे आरक्षण कायम ठेवून संपूर्ण समाजास ओबीसीचा दर्जा देण्यात यावा, समाजास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, तशी शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात यावी, लिंगायत समाजातील प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा, संरक्षक भिंत व सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी, निवडणुकीपूर्वी समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यकर्त्यांना हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा दिला. आगामी निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करण्यात येतील किंवा मतदानावर बहिष्काराचाही निर्णय होईल, असा इशारा प्रदीप वाले यांनी दिला. विजय सगरे यांनी, राज्य शासनाने आरक्षण देऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे गरीब आहेत. त्यामुळे या समाजाला आरक्षणाची खरी गरज आहे. या समाजाच्या उद्धारासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. लोकसंख्येनुसार हा समाज राज्यात अल्पसंख्यांक आहे, याचाही शासानाने गांभार्याने विचार करण्याची गरज आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, या समाजाला आरक्षणाची गरज असून, तात्काळ आरक्षण जाहीर करावे, असे सांगितले. आंदोलनामध्ये विश्वनाथ मिरजकर, राजेंद्र कुंभार, अशोक पाटील, संजय विभुते, मीनाक्षी आक्की, रुपाली गाडवे, शिवराज बोळाज, गजेंद्र कल्लोळी, मनोहर कुरणे, राजू कोरे, मिरजेचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, अभिजित हारगे, तुषार टिंगरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
भर पावसात लिंगायत समाजाचा ठिय्या
By admin | Published: July 15, 2014 11:56 PM