विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटा येथे दि. ६ जानेवारीपासून भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सर्वसामान्य शेतकऱ्यांना विटा शहरातून प्रथमच हेलिकॉप्टरने हवाई सफर अनुभवायला मिळणार असल्याची माहिती आ. अनिल बाबर वाढदिवस सन्मान सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनिल बाबर यांचा दि. ७ जानेवारीला विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विटा येथे दि. ६ ते ९ जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याची माहिती गुरुवारी सन्मान सोहळा समितीने दिली. यावेळी नंदकुमार पाटील, उत्तम चोथे, सभापती महावीर शिंदे, हेमंत बाबर, राजू जाधव, समीर कदम, अतुल बाबर, अभिजित पवार उपस्थित होते.
आ. बाबर यांनी टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात २०० पेक्षा जास्त स्टॉल व विविध जातींची जनावरे सहभागी होणार आहेत. औजारे, मशिनरी, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, ग्रीन हाऊस, स्वयंचलित संसाधने, गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण हेलिकॉप्टरची हवाई सफर आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून आनंद घेता यावा, यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याची हेलिकॉप्टरमधून सवलतीच्या दरात हवाई सफर घडवून आणण्यात येणार आहे. त्यामुळे हे कृषी व पशुपक्षी प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. अनिल बाबर सन्मान सोहळा समितीने केले आहे.