लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यांत कोरोनाचा कहर सुरू आहे. बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. अशा संकटात लोकप्रतिनिधी या नात्याने येथील राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडून जनतेच्या खूप आशा अपेक्षा आहेत. युद्धपातळीवर मदत करा पण कोरोनाबाधित जनतेचे प्राण वाचवा, अशी आर्त हाक पलूस कडेगावकर घालत आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात आपत्तीच्या काळात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी धाव घेत जनतेच्या अनंत संकटांची सोडवणूक केली आहे. कोरोनाच्या संकटातही डॉ. विश्वजित कदम यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाच्या संकटाने रौद्ररूप धारण केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. कडेगाव आणि चिंचणी ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू आहे. मात्र, ती यंत्रणाही अपुरी पडत आहे.
यामुळे डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव आणि पलूसजवळ तुरची फाटा येथे प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. ही निश्चितच जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, येथे व्हेंटिलेटर बेडची सुविधा देऊन गंभीर रुग्णांवर उपचार करणारी आरोग्य यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उपचारांतूनदेखील अनेकांचे प्राण वाचत आहेत; परंतु जीव वाचविण्यासाठी लागणारा लाखोंचा पैसा प्रत्येकाकडेच नाही, हेसुद्धा वास्तव आहे. अशास्थितीत सर्व सुविधा सवलतीच्या दराने किंवा प्रसंगी मोफत उपलब्ध करून देता येईल इतके सामर्थ्य नियतीने डॉ. विश्वजित कदम यांना दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मदतकार्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट :
संस्थात्मक ताकदीवर भरोसा
पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यांत वैद्यकीय सुविधांशिवाय जलद सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांचीही गरज आहे. भारती विद्यापीठ, भारती हॉस्पिटल, सोनहिरा कारखाना या संस्थांच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.