सांगली : पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा संशयितानी राज्य गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) मौन पाळले आहे. तपासावेळी ‘आम्हाला काही माहीत नाही, आम्ही काही केलेले नाही’, इतकेच उत्तर ते अजूनही देत आहेत. दरम्यान, सीआयडीने या सर्वांविरोधात भक्कम पुरावे जमा केले असून, या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असल्याचे सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी बुधवारी सांगितले.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना लूटमारीच्या गुन्'ात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला ‘थर्ड डिग्री’चा वापर करुन बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जंगलातच जाळला होता. याप्रकरणी युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण पोलिस कोठडीत आहेत.
सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकाने कामटेसह सहाजणांची चौकशी सुरू ठेवली आहे. पण चौकशीत या सर्वांकडून सहकार्य मिळालेले नाही. त्यांनी तोंड बंदच ठेवले आहे. चुकून काही तरी माहिती आपल्याकडून सीआयडीला मिळेल, म्हणून काहीच न बोलण्याची खबरदारी ते घेत आहेत. या सर्वांना पोलिस प्रशिक्षण मिळालेले असून, कायद्याची माहिती असल्याने ते तपासात असहकार्य करीत आहेत. तरीही सीआयडीने या सर्वांविरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत.
संशयिताला थर्ड डिग्रीचा वापर करणे, त्याचा खून करणे आणि मृतदेह जाळणे या तीन घटना महत्त्वाच्या असून त्या समोर ठेवूनच पुरावे गोळा केले जात आहेत.कामटेसह सहाजणांकडील तपास, जबाब नोंदविणे, चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. कामटेचा मोबाईल अद्याप मिळालेला नाही. सीआयडीने या सहाजणांचे कॉल डिटेल्स मागविले आहेत. ते मिळाल्यानंतर घटनेदिवशी या सहाजणांनी कोणा-कोणाशी संपर्क साधला होता, हे उघड होणार आहे. अनिकेतला मारहाण करून, त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह आंबोलीत जाळण्यापर्यंतचा घटनाक्रम जुळविण्याचे काम आता सुरू होणार आहे. या साºया घटनेत कामटेसह साथीदारांना मदत करणाºयांनाही सहआरोपी केले जाईल, असे अप्पर अधीक्षक गायकवाड यांनी स्पष्ट केले.कोठडीची मुदत आज संपणारअनिकेतच्या खुनातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपत आहे. या सहाजणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडील तपासाचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप मोबाईल सापडलेला नाही.डॉक्टराचा जबाब घेतलाअनिकेतचा मृतदेह पोलिस बेकर गाडीतून विश्रामबाग येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार सीआयडीने रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. बुधवारी संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टर व प्रयोगशाळा सहायक (लॅब असिस्टंट) या दोघांचे जबाबही सीआयडीने नोंदविले. कामटे व त्याच्या साथीदाराने अनिकेतचा मृतदेह ‘त्या’ रुग्णालयात नेला होता. तेव्हा रुग्णालयात गर्दी होती. कामटे व साथीदारानी लॅब असिस्टंटकडे डॉक्टर आहेत का? अशी चौकशी केली. त्यानंतर ते थोडावेळ रुग्णालय परिसरातच घुटमळले. शेवटी रुग्णालयातील गर्दी व डॉक्टर व्यस्त असल्याचे पाहून ते न भेटताच निघून गेल्याचे सीआयडी तपासात समोर आल्याचे समजते.बॅग्ज हाऊस चालक रडारवरअनिकेतच्या नातेवाईकांनी लकी बॅग्ज हाऊसचा मालक नीलेश खत्री व त्याच्या एका मित्रावरही संशय व्यक्त केला होता. त्यानुसार सीआयडीने त्यांचे जबाबही घेतले आहेत. अजूनही त्यांना चौकशीसाठी अधूनमधून बोलाविण्यात येत आहे. आतापर्यंतच्या तपासातून त्यांच्याकडून फारसे काही हाती लागले नसले तरी, सीआयडीने त्यांना क्लीन चिट दिलेली नाही. त्यांच्याकडे चौकशी सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.वेगवेगळ्या ठाण्यांत रवानगीबडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांना एकाच पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेले नाही. कामटे विश्रामबाग पोलिसांच्या कोठडीत आहे. अनिल लाड याला कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात व उर्वरित चारजणांना मिरज पोलिसांच्या कोठडीत ठेवले आहे.