इस्लामपूर : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता एकापाठोपाठ लागणार आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील सर्व विभागाकडील विकासकामांचे प्रस्ताव लवकर मंजूर करून घेता येतील, या गतीने पाठवा. शेतकऱ्यांना मदत करताना अधिकाऱ्यांनी प्रसंगी संबंधित संस्थांना कायद्याचा बडगा दाखवावा. शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी दिला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात वाळवा तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागाच्या कामाचा आढावा घेण्याच्या बैठकीत मंत्री खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभापती रवींद्र बर्डे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शासकीय सचिव मनोज वेताळ, पं. स. सदस्य अरविंद बुद्रुक, प्रकाश पाटील, नंदकुमार पाटील, तहसीलदार सविता लष्करे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यु. एम. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.खोत म्हणाले, तालुक्यात जलयुक्त शिवारमधून किती पाणी अडवले, याचा अहवाल द्या. गावागावात पाणी पूजन करा, याची छायाचित्रे काढा, प्रसिद्धी द्या. ग्रामस्थांच्या पातळीवर त्यातील त्रुटी समजतील. मी या कामांना भेटी देणार आहे. तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठीचे प्रस्ताव तातडीने द्या. शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करू.वाळवा-शिराळा विभागातील पोलिस वसाहती, इस्लामपूर शहराची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक शाखा पेठ येथे महामार्गावर पोलिस दूरक्षेत्रासाठी जागा मिळावी. कारागृहाची सुधारणा आवश्यक असल्याचे पोलिस निरीक्षक मानकर यांनी सांगितले. खोत यांनी सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वीज वितरणच्या कारभारावर खोत यांनी ताशेरे ओढले. तीन वर्षांपासून शेतकरी, नागरिकांना वीज कनेक्शन मिळत नसतील तर, ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश दिले. शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी शहरातील घरकुल योजनेतील गळती आणि रस्ते प्रश्नांवर आवाज उठवला. लाखो रुपयांचे नुकसान रस्ते कामात झाले आहे. ठेकेदारांची बिले रोखा. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. मंत्री खोत यांनी मुख्याधिकारी झिंजाड यांना या कामांचा अहवाल देण्याची सूचना केली. मार्केट यार्डातील रस्ते करण्याबाबतही पालिकेला त्यांनी सुचवले. (वार्ताहर)कर्ज देण्याची सूचनाविकास सोसायट्यांकडून शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नसेल, तर संबंधित सचिव, संचालकांवर कारवाई करा. शेतकऱ्यांना मदत करण्याचा कामात हयगय करू नका, असेही ते म्हणाले. बैठकीत सर्व विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शिराळा वैद्यकीय अधिकारी, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे फर्मानही खोत यांनी सोडले.
शेतकऱ्यांना मदत नाकारल्यास गय नाही
By admin | Published: July 16, 2016 11:22 PM