सांगली : राज्यातील परवानाधारक ऑटो रिक्षांसह भाडोत्री परवाना बॅचधारक रिक्षाचालकांनाही लॉकडाऊन काळात आर्थिक मदतीची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी परवानाधारक ऑटो रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. भाडेतत्त्वावर रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांना मात्र कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही. परवानाधारक व भाडोत्री रिक्षाचालकांच्यात भेदभाव केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. ही मदत तुटपुंजी असली तरी स्वागतार्ह आहे. अशीच मदत भाडोत्री रिक्षाचालकांनाही मिळावी. गेल्या वर्षभरापासून त्यांचा व्यवसाय बंद असल्याने कंबरडे मोडले आहे. कुटुंबीयांचा अैाषधोपचार, रिक्षांची देखभाल व दैनंदिन खर्चामुळे ते हैराण आहेत. या परिस्थितीत मिळणारी दीड हजार रुपयांची मदत मोलाची आहे.
निवेदन देण्यासाठी जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, अरिफ शेख, महेश सातवेकर, बंडू तोडकर, मोहसीन पठाण, रफिक जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.