मिरज : तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील जनतेला केंद्र व राज्य शासनाची जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, वादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे व युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, गतवर्षापासून कोरोना साथीचे देशात थैमान सुरू आहे. यातून सावरत नागरिक आपले उद्योगधंदे, शेती, रोजगार यावर आपला चरितार्थ करीत आहेत . अशातच देशाच्या पश्चिम किनारपट्टीला 'तौक्ते' या वादळाने धडक दिली. तौक्ते वादळाने राज्यातही अनेक भागात नागरिकांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. घरे कोसळली आहेत. उद्योग-धंद्यांचे व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कोरोना साथीसोबत आता तौक्ते वादळाच्या फटक्याने राज्यातील जनता हवालदिल आहे. यातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊन जनतेला दिलासा द्यावा. तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या भागात आपण पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे व राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली.