लोकमत न्यूज नेटवर्क
जत : येळदरी (ता. जत) येथील सिद्रया आडव्याप्पा माने यांच्या राहत्या घराला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले होते. आमदार विक्रम सावंत यांनी या दुर्घटनेची पाहणी करून माने कुटुंबातील सदस्यांना वैयक्तिक स्वरुपात प्रापंचिक साहित्य देऊन मदत केली.
यावेळी आमदार सावंत म्हणाले, सिद्रया माने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंगावरील कपड्याशिवाय त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक नाही. या आगीत एकत्रित असे ११ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, येळदरीचे सरपंच राम सरगर, तालुका दूध संघाचे संचालक रावसाहेब मंंगसुळी व ग्रामस्थ उपस्थित होते.