सोलापूर : सांगलीतील पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्तांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून जिल्हा प्रशासनाने सांगोला येथून दहा टँकर रवाना केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी शुक्रवारी दिली.अक्कलकोट अन्नछत्र मंडळाने एक ट्रक फूड पॅकेट, पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे एक ट्रक फूड पॅकेट, सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या पाचशे चादरी रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर राऊत यांनी एक ट्रक फूड पॅकेट मदत देण्याचे सूचित केले आहे. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी शिवसेनेतर्फे तीनही जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच लाख चादरी देणार असल्याचे सांगितले. मंत्री तानाजी सावंत व शिवसेना नेते शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी २५ हजार चादरीचा पहिला टप्पा रवाना होणार आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे.सहा वैद्यकीय पथकेशासकीय महाविद्यालयातर्फे डॉक्टरांची सहा पथके औषधाच्या साठ्यासह कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रवाना झाली आहेत, अशी माहिती डॉ. व्ही. आर. झाड यांनी दिली. करमाळा तहसील कार्यालयाचे एक पथक १२ बोटी घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आहे.
सांगलीतील पूरग्रस्तांना सोलापुरातून मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 2:10 AM