विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोनातील टाळेबंदीचा सर्वाधिक फटका गरीब, शेतकरी आणि हातावरचे पोट असलेल्या लोकांना बसत आहे. शिराळा बसस्थानक परिसरात फळे विकणाऱ्या दोन बहिणीदेखील त्याला अपवाद नाहीत. बांबवडे (ता. शिराळा) येथील बाळाबाई जाधव आणि सरिता माने यांना एसटी महामंडळाने भाड्यात सवलत देऊन त्यांना आधार द्यावा, असे त्यांना वाटत आहे.
या बहिणी अनेक वर्षांपासून शिराळा बसस्थानक परिसरात फळे विकतात. यावरच त्यांचे घर चालते. शिराळ्यामध्ये त्या भाड्याच्या खोलीत राहतात. एसटी बसस्थानकाच्या आवारातील दुकानालाही भाडे द्यावे लागते. घरात कोणीही कर्ता पुरुष नाही. शिवाय शेतीही नाही. टाळेबंदीनंतर एसटी बंद झाली. त्यामुळे बसस्थानकात माणसे फिरकत नाहीत. सध्या फिरून फळे विकायला परवानगी दिली आहे, पण यामुळे संघर्षातून बसवलेली घडी मात्र विस्कटलेली आहे. अशा परिस्थितीत त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
बाळाबाई जाधव आणि सरिता शरद माने या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. दोघींचाही घटस्फोट झाला आहे. सरिता यांना मूल होत नसल्याने घटस्फोट झाला आहे. लहानपणीच आईचे छत्र हरपले आहे, तर पंचवीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले आहे. ना सासर आहे, ना माहेरचा आधार! तरीही त्या शिराळा येथे स्वाभिमानाने जीवन जगतात, पण कोरोनामुळे त्यांना पै- पाहुण्यांकडे आणि शेजाऱ्यांकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. महिन्याला दुकानाचे तीन हजार आणि घराचे चार हजार असे सात हजार रुपये भाडे द्यावे लागते. इतर खर्च वेगळाच. अचानक झालेल्या टाळेबंदीमुळे त्यांना आत्तापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे. फळे नाशवंत असल्याने टाकून देण्याची वेळ आली आहे.