सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विविध राज्यस्तरीय पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. प्रसिद्ध समाजसेवक आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अंनिस कार्यकर्ता जीवनगौरव पुरस्कारासाठी बेळगाव येथील प्रभाकर नानावटी यांची निवड करण्यात आली. सन्मानपत्र व १५ हजार रुपये रोख असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. श्रीपाल ललवाणी (पुणे), विनायक माळी (मंगळवेढा), उषा शहा (सोलापूर), मतीन भोसले (अमरावती) यांचाही विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. अंनिसचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य सम्राट हटकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, रामभाऊ डोंगरे, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पुरस्कारांची घोषणा केली.सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार' पुण्यातील अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. सावित्रीमाई फुले महिला प्रेरणा पुरस्कार सोलापूर ‘अंनिस’च्या ज्येेष्ठ कार्यकर्त्या उषा शहा यांना देण्यात येत आहे. सन्मानपत्र व १० हजार रुपये रोख असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.भटक्या-विमुक्त जातीजमातीतील अघोरी प्रथा, चालीरीतींविषयी जागृतीबद्दल प्रबोधन पुरस्कारासाठी मतीन भोसले यांची निवड झाली. मंगळूर चव्हाळा (जि. अमरावती) येथे फासेपारधी मुलांसाठी ते 'प्रश्नचिन्ह' शाळा चालवितात.'सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार' मंगळवेढा अंनिसचे कार्यकर्ते विनायक माळी यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण १ ऑक्टोबररोजी नांदेड येथे अंनिसच्या राज्य कार्यकारणी बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते होईल.
'हेरंब कुलकर्णी' यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 'आगरकर पुरस्कार' जाहीर
By संतोष भिसे | Published: September 25, 2023 7:05 PM