भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील वानरांच्या टोळीने उच्छाद मांडला असून त्यांचा प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वैतागलेल्या नागरिकांकडून होत आहे.
भिलवडीत चाळीसहून अधिक वानर वेगवेगळ्या टोळ्यांच्या माध्यमातून उपद्रव देत आहेत. घरावर उड्या मारून नाचत असल्याने कौले फोडत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विजेच्या खांबावरील तारा, टीव्हीची केबल याचा झोपाळ्यासारखा वापर करून लोंबकळत आहेत. भिलवडीमधील दत्तनगर परिसरातील आंबे, नारळ, चिंच, पेरू, बदाम या झाडांचे तसेच फळांचे मोठे नुकसान केले आहे. त्यांना हुसकावून लावणारी कुत्री, तसेच काठी घेऊन जाणाऱ्या नागरिक, महिला, मुलांच्या अंगावर धावून जाणे, हल्ला करणे आदी घटना घडत आहेत. खिडकी किंवा उघड्या दरवाजामधून वानर घरात घुसून खाद्यपदार्थ व वस्तू पळवून नेत आहेत.
कोरोनामुळे घरात असणाऱ्या नागरिकांना वानरांच्या टोळीकडून प्रचंड त्रास होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.