सांगली: बाबरी पतनात सहभागी असलेल्या एका शिवसैनिकाला पत्रकार परिषदेत हजर करुन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला. हा पुरावा पाहून चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिला.
विभुते यांच्यासह शिवसेनेचे नेते बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर तसेच बाबरी मशिद पाडण्यात प्रत्यक्ष सहभागी असणारे शिवसैनिक सुरेश शेळके यांनी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लबोल केला. विभुते म्हणाले की, बाबरी पाडण्यात शिवसैनिक होते हे यापूर्वीच भाजप नेत्यांनी जाहीरपणे मान्य केले असतानाही चंद्रकांत पाटील यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचे वक्तव्य म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचेच लक्षण आहे.
त्यामुळे आम्ही त्यांना मिरजेच्या रुग्णालयात दाखल करु. त्यांची मानसिकता ओळखूनच भाजप नेत्यांनी राज्यातील दोन नंबरच्या मंत्रीपदावरून त्यांना दूर केले आहे. बाळासाहेब ठाकरेंचे बोट धरुन आलेली भाजप राज्यात व देशावर राज्य करत आहे. मात्र बाळासाहेबांचा त्यांना विसर पडला आहे. आमच्यावर मोदींचे नाव घेऊन मते मागितले, असा आरोप करणाऱ्यांनी हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.
भाजपवाले पिठलं-भात खात बसले होते
शेळके यांनी बाबरी पतनाच्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही बाबरी मशिद पाडत होतो त्यावेळी भाजपचे नेते दोन किलोमिटर दूरवर पिठलं-भात खात बसले होते.