मिरज : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघातर्फे बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री यड्रावकर यांनी दिले.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने व कर्मचाऱ्यांनी मंत्री यड्रावकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मिरज शासकीय रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले असून, आता पुन्हा रुग्णालयाचे सर्व विभाग सुरू करण्यात येत आहेत. अपुरे कर्मचारी असल्याने कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण करूनच रुग्णालयातील सर्व विभाग सुरू करावेत. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊनही बदली कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक बदली कर्मचारी ५८ वर्षे वय झाल्याने कोणताही शासकीय लाभ न मिळता घरी गेले. कर्मचारी भरतीनंतर संपूर्ण रुग्णालय सुरू करावे व न्यायालयीन आदेशाप्रमाणे बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह इतर मागण्या मंजूर करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री यड्रावकर यांनी दिले.
यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित. डॉ. रुपेश शिंदे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. रजनी जोशी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.