सांगली : गतवर्षीच्या पुरामध्ये ब्रम्हनाळ येथे घडलेल्या बोट दुर्घटनेमुळे काही ग्रामस्थांना प्राण गमवावा लागला, तशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी व पुरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी अतिशय उच्च दर्जाच्या, अतिशय वेगवान, कमी वजनाच्या परंतु अतिशय टनक अशा नेदरलँडहून बोटी मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुराच्या काळात या बोटी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.कृष्णा नदीला येत असलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडहुन आणलेल्या अद्यावत आठ यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते आज औदुंबर ता. पलूस येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. अचानक मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला तर निर्माण होणाऱी परिस्थीती नियंत्रीत ठेवण्यासाठी व धरणक्षेत्रामध्ये पडणारा पाऊस यांचे साधारण प्रमाण लक्षात घेवून पुर्ण तयारीने धरणातून विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे.
जलसंपदा विभागाने कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्कात राहून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार कर्नाटक सरकारकडून 2 लाख 20 ते 2 लाख 50 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचे मान्य केले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मर्यादा सोडून जर फार मोठा पाऊस आला तरच पुरपरिस्थती निर्माण होण्याची शक्यता आहे. तथापि, सर्व धरणांमध्ये अतिशय नियोजनबध्द साठा ठेवण्यात आला असल्याने तशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.पुराची तिव्रता कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न शासनाकडून केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून ताकारी, टेंभू व म्हैसाळ या प्रकल्पामधील टेंभू आणि म्हैसाळ हे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. दुष्काळी भागासाठी सांगोला तालुक्यापर्यंत पाणी देण्याचे काम झपाट्याने आजपासून सुरु झाले आहे. टेंभू आणि म्हैसाळ हे प्रकल्पातील सर्व तलाव भरुन देण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये महापुर आला त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले, घरांची पडझड झाली. त्यामुळे यावर्षी शासनाकडून तसेच पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांना बोटी देण्याचे काम सुरु आहे.
गतवर्षी पलूस तालुक्यालाही पुराचा मोठा फटका बसला होता. ब्रम्हनाळ सारखी दुर्घटना घडली त्यामुळे कै. पतंगराव कदम यांच्या नावाने आपतकालीन निधी गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. या निधीमध्ये अनेक लोकांनी मदत केली. या निधीच्या माध्यमातून नेदरलँडहून 8 बोटी सांगली जिल्ह्यासाठी मागविण्यात आहेत. त्यातील 6 बोटी या पलूस तालुक्यातील पुरग्रस्त गावांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
उर्वरित 2 बोटी सांगली शहर व जिल्ह्यातील इतर पुरग्रस्त भागासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या बोटी अतिशय उच्च दर्जाच्या ,अतिशय वेगवान, कमी वजनाच्या परंतु अतिशय टनक असून त्यातून एका वेळेला 18 ते 20 लोकांच्या क्षमतेच्या असून जलदगतीने लोकांना बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.