ओळी : तासगाव बाजार समितीत गुरुवारी सभापती अजित जाधव, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी, उपसभापती धनाजी पाटील यांच्या उपस्थितीत बेदाण्याचे सौदे काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी हिरव्या बेदाण्याला उच्चांकी २५५ रुपये किलोला दर मिळाला. ओंकार सूर्यवंशी यांच्या व्यंकटेश्वरा ट्रेडिंग कंपनीत जमखंडी येथील सिद्धू मोहिते यांच्या बेदाण्यास हा दर मिळाला. सभापती अजित जाधव, उपसभापती धनाजी पाटील, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सौद्यांना सुरुवात झाली.
नवीन बेदाण्याचे उत्पादन सुरू झाले असल्याने तासगाव बाजार समितीत बेदाणा आवकेत वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. गुरुवारी ५२० टन बेदाण्याची आवक झाली, तर ३५० टन बेदाण्याची विक्री झाली. हिरव्या बेदाण्याला सरासरी १०५ ते २२७ रुपये, पिवळ्या बेदाण्यास १०० ते १८५ रुपये, तर काळ्या बेदाण्याला ३० ते ७० रुपये प्रति किलो दर मिळाला.
तासगाव बाजार समितीत बेदाण्याला दर उच्चांकी मिळत आहे. विक्री व्यवस्था आणि बिलाच्या बाबतीत शेतकरी हिताला प्राधान्य दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बेदाणा सौद्यासाठी आणावा, असे आवाहन सभापती जाधव आणि सचिव सूर्यवंशी यांनी केले आहे.