सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये सिंदगीतील शेतकऱ्याच्या बेदाण्यास किलोला २२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सौद्यासाठी आलेल्या बेदाण्यास सरासरी दोनशे रुपये किलो दर राहिला.
बेदाण्यास चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सौद्यासाठी माल आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील आणि सचिव व्ही. जे. राजेशिर्के यांनी केले आहे.बुधवारी येथील आरायना ट्रेडर्समध्ये अकबर खतीब (रा. सिंदगी, जि. विजापूर) यांच्या बेदाण्याला किलोला २२१ रुपयांचा दर मिळाला. खतीब यांचे वीस बॉक्स दत्त ट्रेडर्सने विकत घेतले. बेदाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सहाशे टन माल सौद्यासाठी आला होता. बेदाण्यास सरासरी १६० ते १७० रुपये किलो दर मिळत होता. त्यामध्ये सरासरी चाळीस रुपयांची वाढ होऊन दोनशे रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे.बेदाण्याच्या दरात वाढ झाल्याने बेदाणा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मार्केट यार्डात बेदाणा सौद्यामध्ये चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सौद्यासाठी माल आणावा, असे आवाहन सभापती पाटील आणि सचिव राजेशिर्के यांनी केले आहे.