सांगली : एक महिन्याच्या सुटीनंतर बुधवारपासून मार्केट यार्डात बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी झालेल्या बेदाणा सौद्यात प्रति किलो २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. या सौद्यात ५०० टन बेदाण्याची आवक झाली होती. दिवाळीच्या अगोदरपासून बंद असलेले सौदे सुरू झाले आहेत.
महिनाभरानंतर सौदे सुरू झाल्याने दराबाबत उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी पाचशे टन आवक होती. पप्पू मजलेकर यांच्या दुकानात श्री पद्मन या शेतक-यांच्या ५० बॉक्सला प्रतिकिलो २१५ इतका उच्चांकी भाव मिळाला. हा माल नंदी कृष्णा ट्रेडर्स यांनी खरेदी केला. तसेच चांगल्या प्रतीच्या हिरव्या मालास १६० ते २१०, तर मध्यम प्रतीच्या हिरव्या मालास १२० ते १६० रुपये किलो भाव मिळाला. काळा बेदाण्याच्या दरातही वाढ झाली असून ७० ते १०० रुपये प्रति किलो दर मिळाला. दरात २० ते २५ रुपये प्रति किलो वाढ झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले. सौद्यावेळी मनोज मालू, गगन अग्रवाल, रुपेश पारेख, विनायक हिंगमिरे, मुकेश केसरी, वृषभ शेडबाळे, विनोद कबाडे, जितू शेटे, हिरेन पटेल, अजित मगदूम उपस्थित होते.