सांगली : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्याला राजकीय स्वार्थापोटी विरोध सुरू आहे. जगातील १८७ देशांमध्ये हा कायदा आहे. मग भारतात का नको, असा सवाल करून, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज नपुंसक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केले.
या कायद्याच्या समर्थनार्थ सोमवार, दि. ३० रोजी शिवप्रतिष्ठानच्यावतीने सांगलीत मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भिडे म्हणाले की, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर नेहमीच स्वार्थी भूमिका घेतली जाते. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे लोकच त्यात आघाडीवर आहेत. मुळात हिंदू समाजात राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर नपुसंकता आहे. ही गोष्ट आताची नाही, तर शेकडो वर्षापासून हेच घडत आहे. केंद्र सरकारने कलम ३७०, तिहेरी तलाक आणि आता नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणून देशाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही मंडळी या कायद्याचा अपप्रचार करत, देशात दंगली घडवत आहेत.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवर प्राणघातक हल्ले करत आहेत. अशा दंगलखोरांचा सरकारने तातडीने बंदोबस्त करून, मालमत्तेची होणारी नुकसान भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहोत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व ममता बॅनर्जी यांनीही पूर्वी या कायद्याचे समर्थन केले होते. पण आता हीच मंडळी कायद्याला विरोध करीत आहेत. संरक्षणाबाबतीत आपण सज्ज आहोत. त्याचप्रमाणे नागरिकत्वाबाबततही कठोर पाऊल उचलले आहे. हिंदुस्थानमध्ये शेकडो वर्षांपासून कमजोरी आहे. शत्रू कोण, मित्र कोण हेच त्यांना कळत नाही. केवळ मतांच्या राजकारणासाठी कायद्याला विरोध सुरू आहे. मत, भाषण स्वातंत्र्याचा फायदा घेत जनतेची दिशाभूल सुरू आहे. पण शिवप्रतिष्ठान या कायद्याचे समर्थन करते. त्यासाठी सोमवारी सकाळी दहा वाजता राममंदिर ते मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून कायद्याचे समर्थन करणार आहोत, असेही भिडे यांनी सांगितले. यावेळी कार्यवाह नितीन चौगुले, अविनाश सावंत उपस्थित होते.
- दुष्टबुद्धी बारामतीची की तेरामतीची?
भीमा-कोरेगावप्रकरणी पुणे पोलिसांनी भिडे यांना पुणे जिल्हा बंदीची नोटीस बजाविल्याबाबत ते म्हणाले की, अशी कोणतीही नोटीस मला प्राप्त झालेली नाही. भीमा-कोरेगाव दंगलीशी माझा कोणताच संबंध नव्हता. त्यादिवशी मी इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी उपस्थित होतो. या प्रकरणात मला निष्कारण गोवले आहे. त्यामागे माझ्या बदनामीचा कट आहे. यामागे दुष्टबुद्धी बारामतीची की तेरामतीची हे मला माहीत नाही. सध्या पुणे जिल्'ात कोणत्याच कार्यक्रमाचे नियोजन नाही. त्यामुळे तिकडे जाण्याचे नियोजन नाही.
- गडकोट मोहिमेनंतर मागे लागणार!
भीमा-कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे यांची नाहक बदनामी करण्यात आली. एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांशी संबंधितांनी ‘फंडिंग’ केले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अटकेची मागणी आम्ही केली होती; पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. उलट भिडे यांची बदनामी अजूनही सुरू आहे. गडकोट मोहिमेनंतर बदनामी करणाऱ्यांच्या मागे लागू, असा इशारा कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिला.