शिराळा : दुर्गवेध मित्रपरिवाराने शिराळा तालुक्यात राबवलेल्या ऐतिहासिक वारसा जनजागृती आणि शोध मोहिमेत अनेक वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे समोर आली आहेत. शेकडो वर्षांपूर्वीची शिल्पे दुर्लक्षित असून संवर्धनाची गरज संशोधकांनी व्यक्त केली.मेणी निनाईदेवी मंदिरातील गजलक्ष्मीचे शिल्प मध्ययुगीन काळातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुढे पाचगणी येथे वीर योद्ध्यांच्या पराक्रमाच्या प्रतीक असणाऱ्या दोन वीरगळ दिसून आल्या. युद्धात लढताना धारातीर्थी पडलेल्या योद्ध्यांच्या पराक्रमाची साक्ष त्या देत आहेत. उखळू (ता. शाहूवाडी) येथे मारुती मंदिराशेजारी असणारा दीपस्तंभदेखील पुरातन असल्याचे दुर्गवेधने स्पष्ट केले. त्यावर मारुतीचे शिल्प कोरले आहे.गजलक्ष्मी देवी ही संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीच्या अनेक रुपांपैकी ती एक आहे. भारतात सर्वत्र तिची शिल्पे आढळतात. मेणी येथील गजलक्ष्मीचे शिल्प शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. निनाईदेवीचे मंदिर पुरातन आहे. १९९७ मध्ये जिर्णोद्वार करण्यात आला, त्यावेळी ग्रामस्थांनी या शिल्पाला मात्र धक्का लावला नाही.शोधमोहिमेत कराडचे विनोद निंबाळकर व मेणी येथील आबा सुतार यांच्यासह योगेश कुंभार, शिवानंद धुमाळ, अधिक कोष्टी, महेश मदने, शफिक मुतवल्ली, शाम गोसराडे, उदय ठाणेकर, गजानन हावळ, सत्वशील कोळी, जावेद जमादार, विलास सोनुले व अविष्कार मदने यांनी सहभाग घेतला.
मेणी, गुढे पाचगणी, उखळू येथील ऐतिहासिक पाषाणशिल्पांवर प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 4:53 PM