कडेगाव : इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करून ब्रिटिश सरकारला पळता भुई थोडी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चालता बोलता इतिहास हरपला आहे. अशा शब्दात डॉ. विश्वजित कदम यांनी क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
विश्वजित कदम म्हणाले प्रतिसरकारची स्वातंत्र्यलढ्यातील तीव्रता तेवत ठेवण्यात हौसाताई पाटील यांचे मोठे योगदान होते. त्यांनी वडील क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना साथ देत आंदोलने, मोर्चे काढून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले.
हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी म्हणाले की हौसाताई पाटील या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील धगधगत्या मशाल होत्या. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी हौसाताई पाटील यांना पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली; तर श्रीमंत कोकाटे यांनी हाैसाताई पाटील यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, अशा भावना व्यक्त केल्या.
ॲड. शौर्या पवार, हिंमतराव पवार, बाबा महिंद, सुभाष पवार, परशुराम माळी, माधवराव मोहिते, गुत्तासिंह बाबर, ॲड. दीपक लाड, मोहनराव यादव, दीपक रणदिवे, व्ही. वाय. पाटील, राजाराम गरुड, रावीदादा ढमढेरे, सुरेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, श्रीकांत लाड, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, संतोष गायधने, रमेश बांडे, विवेक गुरव यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी आमदार मोहनराव कदम, सयाजीराव देशमुख, तहसीलदार शैलजा पाटील, शांताराम कदम, हाैसाताई पाटील यांचे पुत्र प्रा. विलासराव पाटील ॲड. सुभाष पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.