सांगली : महापालिकेच्या विविध कार्यालयांत विनामास्क फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले. त्यानुसार सोमवारी चार कर्मचाऱ्यांवर उपायुक्त राहुल रोकडे यांनी दंडात्मक कारवाई केली.
महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन महापालिका कार्यालयातच होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी विनामास्क काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिका आरोग्य विभागाला भेट दिल्यानंतर तेथील कर्मचारी विनामास्क कार्यालयामध्ये काम करीत असल्याचे आढळून आले. या चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे यांनी दंडाची रक्कम वसूल केली. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे; अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवर दंडासोबतच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला.
चौकट
‘लोकमत’चा प्रकाशझोत
महापालिकेच्या विविध कार्यालयांत कर्मचारी विनामास्क काम करीत असल्याबाबत ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.