मिरज : मिरजेत शिवाजी रस्त्यावर राहमतुल्ला हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून तोडफोड व हॉटेलचालकास मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसात सहाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल धोंडीराम घोडके (रा. हायस्कूल रोड मिरज) या आरोपीस अटक करण्यात आली असून, अन्य पाचजण फरार आहेत.
शनिवारी रात्री विश्वेष घोडके, विशाल घोडके, धोंडीराम घोडके व अन्य तिघेजण राहमतुल्ला हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी पार्सल जेवण मागितल्यानंतर हॉटेल बंद झाल्याचे वेटरने सांगितल्याने, विश्वेष याची वेटरसोबत बाचाबाची झाली. यावेळी हॉटेलचालक सनाउल्ला तहसीलदार व अब्दुलअजीज तहसीलदार यांना घोडके पिता-पुत्र व त्यांच्या तीन साथीदारांनी मारहाण करून हॉटेलमधील काचा फोडल्याची तक्रार आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन विशाल घोडके यास ताब्यात घेत, शांतता भंग करणाऱ्यांना पिटाळून लावले.
याप्रकरणी सनाउल्ला तहसीलदार याने शहर पोलिसात फिर्याद दिली असूून सहाजणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या विशाल घोडके यास न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी दिली.