कुपवाड : शासनाने संपूर्ण संचारबंदी लागू केली असताना विविध प्रकारचे घरगुती साहित्य विक्री करणाऱ्या ऑनलाइन विक्रेत्याच्या संपूर्ण साहित्याचा पंचनामा करून महापालिकेने त्याच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही साहित्याची विक्री करण्यावर बंदी आहे. तशातच शुक्रवारी दुपारी कुपवाड शहरातील लक्ष्मी देवळाजवळ ऑनलाइन विक्रेते दुचाकीवरून घरगुती साहित्याची विक्री करण्यासाठी आले होते. ही माहिती कुपवाड शहरातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दीडवळ, राजेंद्र पवार यांच्यासह इतर विक्रेत्यांनी महापालिकेचे सहायक आयुक्त गायकवाड यांना दिली. गायकवाड यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
यावेळी एका कंपनीचा ऑनलाइन विक्रेता घरगुती साहित्याची विक्री करीत असताना आढळून आला. सहायक आयुक्तांनी मालाचा पंचनामा करून त्यास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या कारवाईत स्वच्छता निरीक्षक सिध्दांत ठोकळे, अस्लम जमादार, प्रज्ञावंत कांबळे, गजानन जाधव व एम. बी. गालफाडे सहभागी होते.
फोटो ओळ : कुपवाडमध्ये महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑनलाइन विक्रेत्याला दहा हजारांचा दंड ठोठावला.