लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत खंडेराजुरी ते गवळीवाडी पाईपलाईनच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रविकास सेनेतर्फे बुधवारी पाटबंधारे कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
युवक राष्ट्रविकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या निवेदनात सदामते यांनी म्हटले आहे की, संबंधित कामाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी. प्रशासनाचा वेळ आणि पैसा वाया घालवणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करून निलंबित करावे.
जोपर्यंत या कामाची चौकशी करून कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सिंचन योजना या सामान्य लोकांच्या सोयीसाठी आहेत की ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी आहेत, अशी शंका येत आहे. चांगल्या दर्जाचे काम केल्यास ते दीर्घकाळ टिकणार आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात विनोद मोरे, सिद्धू गायकवाड सहभागी झाले होते.