सांगली : महापालिका क्षेत्रातील पथदिवे बंद असल्याने निम्म्याहून अधिक भाग अंधारात आहे. प्रशासनाकडून पथदिव्यांच्या साहित्य खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया होऊनही चालढकल सुरू आहे. ही निविदा तातडीने मंजूर करावी, अन्यथा विद्युत विभागाला टाळे ठोकू, असा इशारा देत नगरसेवकांनी गुरुवारी स्थायी समितीची सभा रोखून धरली.
त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करीत निविदेच्या दरमान्यतेचा विषय स्थायी समितीसमोर आणला. सर्वच सदस्यांनी एकमताने ऐनवेळच्या ठरावात साहित्य खरेदीला मंजुरी दिली.महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संदीप आवटी यांच्या अध्यक्षेतखाली पार पडली. कॉलेज कॉर्नर बालाजी मिलपासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती होत नसल्याचा मुद्दा सदस्य मनोज सरगर यांनी सभेत मांडला.
यावर अभिजित भोसले, योगेंद्र थोरात आदी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. योगेंद्र थोरात यांनी पथदिवे बंद असल्याने शहर अंधारात आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत.
स्थायी समितीने साहित्य खरेदीसाठी एक कोटीची निविदा काढण्यास मान्यता दिली असताना, अद्याप निविदा का निश्चित केली नाही? असा सवाल केला. जर पथदिव्यांची दुरूस्ती होत नसेल, तर विद्युत विभागाला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला.सभापती संदीप आवटी यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रभारी विद्युत अभियंता पाटील यांनी पथदिवे साहित्य खरेदीची ३८ लाखांची निविदा अंतिम केली आहे. ठेकेदारदेखील निश्चित केला असून, अंतिम मान्यतेसाठी पुढील आठवड्यात स्थायी समितीसमोर हा विषय आणला जाईल, अशी ग्वाही दिली. मात्र सदस्य आक्रमक झाले. त्यांनी स्थायी समितीची सभा रोखून धरली.
आजच हा विषय स्थायीत आणा, आम्ही ऐनवेळच्या विषयात मान्यता देतो, असे सांगितले. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी होकार दिला आहे. सर्व सदस्यांनी साहित्य खरेदीच्या निविदेला ऐनवेळच्या विषयात मान्यता दिली आहे. त्यामुळे पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले आहे.