लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी २५२५ सभासद मतापासून वंचित ठेवण्यासाठी अक्रियाशील ठरविल्याबद्दल वांगी (ता. कडेगाव) येथे मतदार यादीची बुधवारी होळी करण्यात आली.
घाटमाथ्यावरील ११९३ सभासद अक्रियाशील ठरले आहेत.
कृष्णा कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह सत्ताधारी मंडळींनी २५२५ सभासदांना अक्रियाशील ठरविण्यासाठी
नोटीस पाठविली होती. या सभासदांची नावे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. यावरून संबंधित सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी द्वेषभावनेतून सत्ताधारी मंडळींनी केलेले कारस्थान आहे, असा आरोप करण्यात आला.
पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी घाटमाथ्यावर तोडणी वाहतूक यंत्रणा कमी दिली. येथील ऊस अत्यंत कमी प्रमाणात गाळपासाठी नेला आहे. तोडणी वाहतूक कमी असल्यामुळे येथे सभासद अक्रियाशील झाले आहेत. येथील सभासद वयस्क असल्यामुळे वार्षिक सभेस हजर राहू शकत नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे,
अशी मागणी ॲड. प्रमोद पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी रमेश एडके, सतीश तुपे, तोहिद शिकलगार, आबासाहेब शिंदे, शामराव हुबाले, भास्कर जाधव, माणिक मोरे उपस्थित होते.