दिलीप कुंभार
नरवाड : कोरोनामुळे पानांचे खुले सौदे बंद असल्याने पान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापले आहेत. सलग दोन वर्षे पान व्यवसायावर मंदीचे सावट कायम आहे. कोरोनामुळे पान बाजारपेठेतील पानांचे सौदे बंद असल्याने पान व्यवसाय पान दलालांच्या हाती गेला आहे. परिणामी पान व्यापारी म्हणेल त्या किमतीला खाऊची पाने द्यावी लागत आहेत.
पान व्यवसायात जिल्ह्याचे योगदान अर्थपूर्ण असून सुमारे २२४ हेक्टर क्षेत्रावर पानमळयांची लागण झाली आहे. वार्षिक लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असल्याने पान उत्पादकांचा संसाराचा गाडा मोडून पडला आहे.
पान व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचीही आर्थिक कुचंबणा होत आहे. पानवेली बांधणारे, खुडा करणारे, हमाल, वाहतूकदार आदींवरती संक्रांत आली आहे.
एक एकर पानमळा तयार करण्यास किमान १ लाख रुपये खर्च येतो. एका पानवेलीच्या कलमाची (बी) किंमत १० रुपये आहे. अशी एकरी ६ ते ७ हजार कलमे लागतात. याची किंमत ६० ते ७० हजार रुपये होते. मंदीमुळे पानांचा खुडा बंद असल्याने पानमळ्यात पानांचा खच लागला आहे. इतकी गुंतवणूक करूनही पदरी काहीच पडत नसल्याने आता शासनाने खुले सौदे सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट
सलग दोन वर्षे पान उत्पादक शेतकरी तोट्यात चालला आहे. आता शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्वरित खुल्या पान विक्रीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
श्रीअंश लिंबीकाई, पान उत्पादक शेतकरी.