सांगली : सांगली जिल्ह्याला कोरोनाची दुसरी लाट तुलनेने फारच महाग ठरली आहे. होम आयसोलेशनविषयी बेफिकिरी नडल्याने पाहता पाहता जिल्हा रेड झोनमध्ये जाऊन बसला.
विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात रुग्णसंख्या २००० वर जाऊन पोहोचली. पहिल्या लाटेत २२ मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये लाट कमी होईपर्यंत प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेले. शाळा, महाविद्यालयांच्या इमारती, सभागृहे, मंगल कार्यालयांत रुग्णांना ठेवले होते. त्यामुळे प्रत्येक रुग्णावर लक्ष राहिले. यंदा संस्थात्मक विलगीकरण गांभीर्याने राबवले गेले नाही. होम आयसोलेशनमध्येच रुग्ण राहिले. हे रुग्ण नियम झुगारून लावत बिनाधास्त रस्त्यावर येत राहिले. इतरांसाठी ते सुपर स्प्रेडर ठरले. यामुळे वेगाने रुग्णसंख्या वाढत गेली. जिल्हा रेड झोनमध्ये गेल्यावर होम आयसोलेशनसाठी प्रशासनाला जाग आली.
कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही संख्यावाढीस कारणीभूत ठरला. परगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणातील बेफिकिरीही नडली. पुण्या-मुंबईहून आलेले पाहुणे थेट गावात फिरत राहिले. गावपातळीवर दक्षता समित्या बेफिकीर झाल्या. त्यामुळेही जिल्हा पाहता पाहता रेड झोनमध्ये गेला.