सांगली : याचि देहा, याचि डोळा अनुभवण्याची जिवंत कला सरत्या वर्षाने आधुनिकतेच्या नव्या ऑनलाईन पटलावर जिवंत ठेवण्याचे काम केले. कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी धडपडणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या घरीच कलाकारांनी कला सेवा दिली. सांस्कृतिक क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचे काम आता सुरू झाले आहे.
नाट्य व संगीत क्षेत्राला कोरोना काळात प्रदीर्घ विश्रांती घ्यावी लागली तरी कलेचा हा प्रवाह अखंडित वाहू देण्यासाठी कलाकारांनी ताकद लावली आणि ही कला खळाळत पुढे जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या नाट्य संमेलनाच्या शताब्दीचे हे वर्ष सुनेसुने गेले. नाट्यपंढरी सांगलीत शताब्दीची लगबग सुरू असतानाच कोरोनाचा कहर सुरू झाला आणि शताब्दी कार्यक्रमावर पडदा पडला.
कलाकारांची घुसमट दूर करण्याचा नवा फंडा म्हणून ऑनलाईन रंगमंच तयार करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेमार्फत कथा, कविता, नाट्यवाचन, दिवंगत नाट्यकलाकारांवर व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन येथील कलाकारांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.
रसिकांची प्रत्यक्ष दाद मिळवित रंगणाऱ्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या मैफलींनीही ऑनलाईनची वाट धरली. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानने यात आघाडी घेतली. स्वरवैभव क्रिएशनच्या माध्यमातून परेश पेठे व त्यांच्या कलाकारांनी आठवणीतील गाण्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिला. संस्कार भारतीनेही त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दीपक पाटणकर यांनी सावरकरांच्या गाण्यांचा कार्यक्रम, सुनीलकुमार लवटे यांच्या साहित्यावरील चर्चा, राज्यस्तरीय वर्तमान कवी संमेलन, संजय ठिगळे यांचे कवी संमेलन ऑनलाईन घेतले. डॉ. अनिल मडके, महेश कराडकर, भीमराव धुळुबुळू यांच्यासारख्या कवींनी यात सहभाग घेतला. यंदाचा मिरजेतील अंबाबाई संगीत महोत्सवही ऑनलाईन झाला. एकूणच सांस्कृतिक क्षेत्राने कूस बदलून नव्या रुपात रसिकांची सेवा केली.