दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्टवादीकडून आमदार सुमनताई पाटील व त्यांच्याविरोधात भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे असा सामना होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र बुधवारी तासगाव तालुक्यात खासदार समर्थकांकडून खासदारांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली आहे. भाजपकडून घोरपडेंची चर्चा होत असतानाच, खासदारांच्या होममिनिस्टर विधानसभेच्या पटावर आल्याने भाजपच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीकडून आ. सुमनताई पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून घोरपडेंना उमेदवारीचा शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपासून तासगाव तालुक्यावर फोकस करून भेटीगाठीचा धडाका सुरु केला आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची खात्री झाल्याने घोरपडे यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र बुधवारी तासगाव तालुक्यात उमेदवारीवरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. भाजपच्या संजयकाका समर्थक काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर विधानसभेसाठी खासदार पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील याच विधानसभेच्या उमेदवार असतील, अशा पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्योतीतार्इंनी दोन्हीवेळच्या लोकसभा निवडणुकीत आणि इतरही निवडणुकांतून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जनसंपर्क ठेवला आहे. राष्टÑवादीकडून महिला उमेदवाराला फाईट देण्यासाठी, तसेच संजयकाकांच्या विकास कामांच्या ‘गुडविल’चा फायदा उचलण्यासाठी ज्योतीताईच योग्य उमेदवार आहेत, असा दावा केला जात आहे.
तसेच भाजपकडून सर्वेक्षण झाले असून, यामध्ये ज्योतीतार्इंची उमेदवारी प्रबळ ठरणार असल्याचा दावाही खासदार समर्थकांकडून केला जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्योतीतार्इंचे नाव विधानसभेच्या पटावर आल्याने भाजपच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्योतीतार्इंची उमेदवारी ऐनवेळी रेटली जाणार, की केवळ सोशल मीडियावर चर्चा होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.व्हायरल फॉर्म्युलामाजी मंत्री अजितराव घोरपडेंचा तासगाव तालुक्यात संपर्क कमी आहे. त्यामुळे घोरपडेंविरोधात सुमनताई पाटील अशी लढत झाली, तर तासगाव तालुक्यात फटका बसू शकतो. याउलट खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई आणि सुमनताई अशी लढत झाल्यास जोरदार लढत होणार आहे. त्यामुळे ज्योतीतार्इंना विधानसभेची उमेदवारी आणि घोरपडेंची विधानपरिषद किंंवा महामंडळावर वर्णी लावून तासगावचा राष्टÑवादीचा बालेकिल्ला ताब्यात घेण्याची व्यूहरचना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा पक्षीय पातळीवरूनच होणार आहे. माझ्या उमेदवारीबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यांच्या आदेशानुसारच मी मतदारसंघात बैठका, भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. सध्या तासगाव तालुक्यातील प्रत्येक गावात भेटी सुरू असून, कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्योतीतार्इंच्या उमेदवारीबाबत माझ्यासोबत कोणाचीही चर्चा झालेली नाही. मला सोशल मीडियावरूनच माहिती मिळाली आहे.- अजितराव घोरपडे, माजी मंत्री