आष्टा : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आष्टा शाखेतील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाचे सापडलेले पैसे प्रामाणिकपणे परत दिले. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ग्राहकाचे पैसे परत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
आष्टा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर जिल्हा बँकेची शाखा आहे. या शाखेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तराज हिप्परकर वीज बिल भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पाकिटातील २ हजार रुपये खाली पडले ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. काही वेळाने बँकेचे कर्मचारी पोपट कामीरे यांना पैसे सापडले. त्यांनी बँकेचे अधिकारी महेश गायकवाड यांच्याकडे पैसे दिले. याबाबत दत्तराज हिप्परकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सुरुवातीला माझे पैसे पडले नाहीत, असे सांगितले. मात्र, खात्री करण्यासाठी त्यांनी पाकिटातील पैसे मोजले. यावेळी दोन हजार रुपये हरवुल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत पोपट कामीरे यांना नोटांचा तपशील सांगितला. तो बरोबर असल्याने बँकेचे अधिकारी महेश गायकवाड व पोपट कामिरे यांनी तातडीने सापडलेली रक्कम हिप्परकर यांना परत केली.